औरंगाबाद: फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची एक लाख 56 हजारांची बॅग तिघांनी हिसकावून पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील निपाणी शिवारात घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बारा तासात तीन लुटारूंना गजाआड केले आहे.
शुभम उर्फ संभाजी उर्फ हवा शाम पिंपळे (रा. कारेगाव, अशोक नगर, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर), अंबादास कचरू कोरे (रा. रोहतळे, ता. शेवगाव) व लखन उर्फ रवींद्र अशोक साळवे (रा. चितेपिंपळगाव) असे गजाआड करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, विजय ऋषीधर माने वय २० वर्षे (रा. मठपिंपळगाव ता. अंबड, ह. मु. कॅनॉट प्लेस) हे भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड कॅनॉट प्लेस येथे कार्यरत आहेत. बुधवारी पिंपरीराजा,आडगाव, घारेगाव येथील ग्राहकाकडून वसुली करण्यासाठी गेले होते. तेथून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये घेऊन दुचाकीने औरंगाबाद कडे येत होते. यावेळी निपाणी शिवारात दुपारच्या सुमारास त्यांच्या दुचाकीच्या मागे दुचाकीवर आलेल्यांनी विजय माने यांना चालत्या दुचाकीवरून लाथ मारली. त्यामुळे विजय माने हे रस्त्यावर जोरात आपटले. लुटारूंनी त्यांच्या बॅगेतील पैसे घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी माने यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. तात्काळ या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेशही देण्यात आले होते. ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे व चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी तपासाची चक्रे फिरवत तपासाला सुरुवात केली. हवा पिंपळे हा चितेगाव येथे राहात असल्याची माहिती समोर आली. त्यानेच ही घटना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हवा पिंपळे याला अहमदनगर जिल्ह्यातील कारेगाव येथून ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा आपले मित्र अंबादास कोरे व लखन साळवे यांना सोबत घेऊन केल्याची माहिती दिली. एक जून रोजी केंब्रिज चौकालगतच्या उड्डाणपुलावर याच फायनान्स कंपनीच्या एका वसुली अधिकाऱ्यालाही याच टोळीने लुटल्याची माहिती समोर येत आहे. यांनी अशा लूटमारीच्या घटना किती केल्या आहेत ते तपासात समोर येणार आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलहत, जमादार विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, गणेश मुळे, रतन वारे, श्रीमंत भालेराव, पोलीस शिपाई गणेश गांजवे, योगेश तर्माले, नारायण कटकुरी, लहू थोटे, दीपक सुराशे यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे हे करीत आहेत








